मँनेजमेंट मंत्रा

मँनेजमेंट मंत्रा

मंडळी हो मँनेजमेंट किंवा मँनेज करणे हे शब्द सध्याच्या जगात सगळ्यांना सर्वश्रुत आहेत. मॕनेज करणे अथवा मॕनेजमेंट याचा अर्थ व्यवस्थापन करणे होय, अर्थात या शब्दांना तसेच याच्याशी निगडीत कृतीँना आपण सगळेजण लहानपणापासून ओळखतो, जाणतो आणि आचरणातही आणतोच.

लहान असताना आईवडीलांजवळ कोणत्या गोष्टींसाठी रडायचे, कोणत्या कारणांसाठी हट्ट करायचा आणि आपल्या मनातले कसे साध्य करायचे हे मॕनेज करायचे तंत्र आपल्याला चांगलेच अवगत होते. जसजसे मोठे होऊ लागलो तसतसे आपण आपला अभ्यास, आपले खेळ,आपले मित्रमैत्रीणी, आपले छंद आणि आवडीनिवडी साठी लागणारा वेळ हे सगळे मँनेज करायला शिकलो. कालांतराने आपल्यावर काही जबाबदाऱ्या वाढल्यामुळे आपण आपले घर, कुटुंब, पैसा,वेळ, हौसमौज, बँकबँलेन्स हे  सगळे मँनेज करायला शिकलो. थोडक्यात आपल्या जबाबदाऱ्या जसजश्या वाढत गेल्या तसे आपण त्या मॕनेज करण्यात म्हणजे व्यवस्थापन करण्यात जास्त पारंगत आणि यशस्वी होत गेलो.  हे व्यवस्थापन करत असतानाच आपण आपल्या मनाचेही व्यवस्थापन पण शिकलो. मनातील कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे,कोणत्या गोष्टींना मूरड घालायची आणि कोणत्या गोष्टींना प्राथमिकता द्यायची  याचे यशस्वी व्यवस्थापन करायला लागलो. आपल्या बरोबर आपण आपल्या संपूर्ण कुटुंबाचे व्यवस्थापन करायला शिकलो. थोडक्यात काय तर लहानपणापासून हे व्यवस्थापन आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनले, सवयीचा भाग बनले. म्हणजेच व्यवस्थापन आपल्या अंगवळणी पडले.

आपल्या घरातील स्त्रियांना  हे मॕनेजमेंट तंत्र अतिशय कौशल्यपूर्वक हाताळताना तुम्ही कधी बघितले आहे का?  म्हणजे हेच बघा ना नविन लग्न होऊन जेव्हा ह्या स्त्रिया एखाद्या घरात सुन म्हणून वावरायला सुरू करतात तेव्हा त्या आपल्या पती बरोबरच घरातील इतर सदस्यांचे स्वभाव,सवयी समजून घेतात आणि मग स्वतःला ,स्वतःच्या सवयींना, स्वभावाला, काम आणि कामाच्या वेळांचे व्यवस्थापन करायला शिकतात. हळूहळू मुलं,त्यांच्या शाळा, अभ्यास या जबाबदाऱ्या मँनेज करायला शिकतात. आणि ह्यातून जर त्या स्वतः नोकरी करणाऱ्या असल्या तर घरातले काम,आपल्या नंतर दिवसभर घरात राहणाऱ्या सदस्यांची सोय, आँफीसला जाताना वाहतूक गर्दी,वेळ,लोकल,बस हे सगळे कसे कुशलतेने मॕनेज करतात. मला वाटते खरंतर स्त्रियांमधे हे व्यवस्थापन कौशल्य उपजतच अंगीभूत असावे असे म्हणायला हरकत नाही.

मंडळी हो व्यवस्थापन किंवा मॕनेजमेंट हे आपल्या वैयक्तिक आयुष्यातील असो वा आपल्या उद्योग  व्यवसायातील असो त्याचा मुळ आधार कुठे लपला आहे याचा अभ्यास जेव्हा मी केला काही गोष्टी जाणवल्या. आपण सगळेजण शाळेत किंवा महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयात शिकलो आहोत की मागणी,पुरवठा ,उत्पादन आणि उत्पन्न यांच्या चतुःसुत्रीवरच संपूर्ण व्यवस्थापन अवलंबून असते. आपल्या मालाची जितकी मागणी असेल तेवढाच पुरवठा ठेवला तर होणारे  उत्पादनात  समतोल राखू शकतो. अनावश्यक उत्पादन करून आपण ते वाया जाण्यावर निर्बंध घालू शकतो.यामुळे आपण आपले उत्पन्न पण चांगल्या पध्दतीने घेऊ शकतो. हेच तंत्र आपण आपल्या कामासाठी, त्यासाठी लागणाऱ्या वेळेसाठी तसेच श्रमासाठी ठिकठिकाणी वापरू शकतो.

खरंतर मॕनेजमेंट म्हणजेच व्यवस्थापन क्षेत्रात मी जपान ह्या देशाला अत्यंत आदरणीय मानते. जपान देशाने मॕनेजमेंटचे काही महत्त्वाचे आणि उपयोगी तंत्र विकसित केले आहेत. कायझन मँनेजमेंट तंत्र ,लिन मँनेजमेंट तंत्र ,कानबान मँनेजमेंट तंत्र अशी त्यातील काही नावे आहेत. ही तंत्र  आपल्याला वैयक्तिक तसेच व्यवसायाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना उपयोगात आणू शकतो. आपल्या व्यवसायात कामगार, उत्पादन, कच्च्या आणि पक्का माल, त्याची साठवणूक  यासगळ्याचा समतोल राखण्यासाठी खूप मदत करतात. या  तंत्रापैकी कोणतेही एक तंत्र जरी आपण आत्मसात केले, उपयोगात आणले तरी आपण आपल्या श्रमाचे व्यवस्थापन, पैश्याचे व्यवस्थापन, वेळेचे व्यवस्थापन, उत्पादना आणि उत्पन्न याच्या व्यवस्थापनात निश्चितच सकारात्मक फरक पडतो.

मला स्वतःला यातील लिन मॕनेजमेंट तंत्र अतिशय आवडते. मी जेव्हा अभ्यास केला तेव्हा मी आधी माझ्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक गोष्टींमधे वापरले ज्यामुळे मला माझा वाया जाणारा पैसा,वेळ आणि श्रम याचे ज्ञान झाले. याबाबतीत एक छोटे उदाहरण मी तुम्हाला माझ्या घरी महिन्याचे आणले जाणाऱ्या सामानात कसे वापरले हे सांगते. लीन मॕनेजमेंट तत्वाप्रमाणे सर्वप्रथम मी माझ्या घरातील वस्तूंचे तीन भागात विभागणी केली. पहिल्या भागात मला दर महिन्यात नेहमीच आवश्यक आणि लागणाऱ्या वस्तू ज्यांना आपण रनर वस्तू म्हणू शकतो.  दुसऱ्या भागात मला कधीतरी लागणाऱ्या वस्तू म्हणजे सणवार,समारंभ यासाठी लागणाऱ्या वस्तू ज्यांना आपण रिपीटर वस्तू म्हणू शकतोआणि तिसऱ्या भागांत माझ्या हौसेमौजे करीता लागणाऱ्या वस्तू ज्यांना आपण स्ट्रेंजर म्हणू शकतो. आता या विभागणी मुळे मला हे लक्षात आले की माझा पैसा कुठे आवश्यक तर कुठे अनावश्यक खर्ची होत आहे. ज्या वस्तू पहिल्या भागात आहेत तो खर्च माझ्यासाठी आवश्यकच होता दुसऱ्या भागात येणाऱ्या वस्तूवरील होणारा माझा खर्च कधीतरी होणारा होता. तिसऱ्या भागातील वस्तू आणि त्यावर नेहमीच  अनावश्यक खर्च केला जाणारा  पैसा माझा वाचू लागला.
आपल्या व्यवसायात हे लीन तंत्र वापरताना सुध्दा तुम्ही याच पध्दतीने करू शकता. मग तुम्ही रिटेल,होलसेल आणि मँन्युफँक्चरींग अश्या कोणत्याही व्यवसायात असाल तरी तुम्ही तुमच्या कच्च्या तसेच पक्का मालाची विभागणी तुमच्या सेल्स रिपोर्ट प्रमाणे या तिनही भागात करू शकता. जर तुम्ही रिटेल व्यावसायिक असाल तर तुम्ही तुमच्या विक्री तपशीला प्रमाणे तुमच्या  कडील वस्तूंची या तीन भागात विभागणी करू शकता. पहिल्या भागातील वस्तूंचा पुरवठा जर तुम्हाला लगेचच होत असेल तर फार साठा करून न ठेवता तुम्ही त्याची खरेदी सायकल 15 दिवस किंवा एक महिना इतक्या कालावधीत करून फ्रेश माल सतत ठेवू शकता. तसेच दुसऱ्या भागातील वस्तूंचा साठा किती ठेवायचा आणि कधी तसेच कसा खरेदी करायचा हे तुम्ही ठरवू शकता. या दोन भागांचे योग्य व्यवस्थापन केल्यास तिसऱ्या भागातील वस्तू ज्या तुम्ही प्रायोगिक तत्वांवर आणता त्याचा खर्च सुध्दा कधी,केव्हा आणि कसा करायचा ह्याचे व्यवस्थापन तुम्हाला सहज जमेल आणि या सगळ्यामुळे तुम्ही तुमच्या खर्च आणि उत्पन्नात सुध्दा समतोल आणू शकता. हेच तंत्र तुम्ही तुमच्या कडील कामगारांच्या साठी वापरू शकता. या कामगारांच्या क्षमता,त्यांच्या मुळे तुमच्या व्यवसायात होणारा फायदा तसेच त्यांचे स्कील नुसार त्यांचे या तीन भागात विभागणी करून हे तंत्र उपयोगात आणू शकता.

खरंतर हा विषय खूप मोठ्या अभ्यासाचा आहे. पण मला खात्री आहे जर या मॕनेजमेंट मंत्रावर आपण अजून जास्त अभ्यास केला आणि माहिती  आपल्या व्यवसायानुरूप घेतली तर निश्चितच यशस्वी व्यावसायिक होण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही.